विशेष प्रतिनिधी
पुणे:आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, महायुती आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळेच पक्षातील अनेक नेत्यांनी लॉबिंग सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या स्थानिक पातळीवर प्रभाव असलेले काही माजी आमदार, जिल्हा परिषदेतील माजी पदाधिकारी, तसेच शहर आणि जिल्हा संघटनांमध्ये काम केलेले पदाधिकारी हे सर्वजण उमेदवारीसाठी प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, पक्षात अलीकडेच झालेल्या फूटीनंतर निष्ठावंतांना संधी देण्याचा दबावही पक्ष नेतृत्वावर वाढत आहे. त्यामुळे ‘जुने की नवे’ असा अंतर्गत पेचही निर्माण झाला आहे.
पक्षातील काही महिला नेत्यांची नावेही चर्चेत असून, महिला आरक्षण आणि महिला प्रतिनिधित्वाचा मुद्दा लक्षात घेता पक्ष नेतृत्व एखाद्या महिला चेहऱ्याला संधी देऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर ओबीसी आणि इतर मागासवर्गीय समाजातील प्रतिनिधित्वाचा विचारही समीकरणात महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे उमेदवारी निश्चित करताना सामाजिक समतोल साधण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर असेल.
या नावांची चर्चा
शहरातील वडगावशेरी मतदार संघाचे माजी आमदार आणि शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांचा नावाची चर्चा शहरात ऐकायला मिळत आहे.विधानसभेत पराभव झाल्यानंतर विधान परिषदेसाठी सुनील टिंगरे यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो.
पिंपरीचिंचवड मधील अजित पवार गटाचे नेते नाना काटे यांचे नाव देखील विधानपरिषदेसाठी चर्चेत आहे.पिंपरी चिंचवडचे दिवंगत माजी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत नाना काटे यांनी अश्विनी जगताप यांचा विरोधात उमेदवारी देण्यात आली होती,मात्र त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.राष्ट्रवादी फुटल्यानंतर नाना काटे यांनी अजित पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले होते,त्यामुळे विधान परिषदेसाठी त्यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो.
रूपाली ठोंबरेंचे सुनेत्रा पवारांना पत्र..
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून विधानपरिषदेसाठी आपल्या नावाचा विचार करण्याची विनंती केली आहे.मागील २० वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून विधानपरिषदेसाठी संधी मिळावी अस रूपाली ठोंबरे यांनी पत्रात नमूद केलं आहे.
एकूणच, पुण्यातील विधान परिषद निवडणूक ही आगामी काळातील स्थानिक राजकारणासाठी दिशादर्शक ठरणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी सुरू असलेली स्पर्धा येत्या काही दिवसांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
A tug of war within the Ajit Pawar faction for the Legislative Council; Who will get a chance?
महत्वाच्या बातम्या