विशेष प्रतिनिधी
सातारा : सातारा जिल्ह्यात जर शिवसेनेची ताकद नाही असे आमदार महेश शिंदे म्हणत असतील, ते स्वतःच्या मतांवर निवडून आले असे म्हणत असतील तर तो शिवसैनिकांचा अवमान ठरेल, असा हल्लाबोल मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे . पक्षात कोणालाही डावलले जात नाही, असेही देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
महेश शिंदे यांनी पक्षात आपल्याला वेगळी वागणूक मिळत असल्याची टीका केली होती. यावर आता शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले की, शिवसेना हा शिस्तबद्ध पक्ष आहे आणि पक्षाच्या मुख्य नेत्यांच्या दौऱ्यावेळी वेगळे निमंत्रण देण्याची पद्धत नाही. कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे अपेक्षित असते. काही बॅनरवर महेश शिंदे यांचे फोटो नव्हते, मात्र त्यांना कार्यक्रमाची माहिती देण्याचे आदेश जिल्हाप्रमुखांना देण्यात आले असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
महेश शिंदे यांना डावलले जात आहे का? यावर उत्तर देताना शंभूराज देसाई म्हणाले की, अनेक बैठकीत त्यांनी स्वतः शिंदे उपस्थित आहेत का याची चौकशी केली आहे. जर त्यांना निमंत्रण मिळाले नाही, असा दावा केला जात असेल, तर त्याची चौकशी केली जाईल, असेही देसाई यांनी म्हटले आहे. तसेच महेश शिंदे यांनी स्वतःच्या ताकदीवर निवडून आल्याचे वक्तव्य केले असेल तर ते शिवसैनिकांचा अपमान ठरेल. जिल्ह्यातील सर्व निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे शिवसैनिकांच्या ताकदीवरच निवडून आले असल्याचे देसाई यांनी म्हटले.
सातारा जिल्ह्यात शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीने 37 जागा जिंकून बहुमत मिळवले असून, जिल्ह्यात 100 हून अधिक लोकप्रतिनिधींच्या निवडीतून शिवसेनेची ताकद सिद्ध झाल्याचे शंभुराज देसाई यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, जिल्हा परिषद निवडणुकीपासूनच शंभुराज देसाई आणि आमदार महेश शिंदे यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Mahesh Shinde accused of insulting Shiv Sainiks, Shambhuraj Desai hits out
महत्वाच्या बातम्या