Watermelon : कलिंगड मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; फॉरेन्सिक अहवालात विषाचा पुरावा नाही

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Watermelon  कलिंगड खाल्ल्यानंतर एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याच्या गाजलेल्या प्रकरणात फॉरेन्सिक अहवालामुळे नवे वळण आले आहे. तपासासाठी पाठविण्यात आलेल्या अन्नपदार्थ, भांडी आणि उंदीर मारण्याच्या औषधामध्ये झिंक फॉस्फाईडचे कोणतेही अंश आढळले नसल्याचे फॉरेन्सिक प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणातील गूढ अधिकच वाढले असून पोलिसांनी सर्व तपासाच्या दिशांचा पुन्हा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.Watermelon

या घटनेत डोकाडिया कुटुंबातील पती, पत्नी आणि त्यांच्या दोन मुलींचा मृत्यू झाला होता. कुटुंबातील इतर पाच नातेवाईकांसोबत त्यांनी रात्रीच्या जेवणात चिकन पुलाव खाल्ला होता. त्यानंतर मध्यरात्री कलिंगड खाल्ल्यानंतर काही तासांतच चौघांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केलेला स्वयंपाकघरातील चाकू, तीन मोठे चमचे, चार ताटे, कच्चा तांदूळ, चिकन पुलाव तसेच उंदीर मारण्यासाठी वापरले जाणारे हर्बल स्प्रेचे बाटली नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविले होते.Watermelon



नुकत्याच प्राप्त झालेल्या अहवालानुसार, तपासासाठी पाठविण्यात आलेल्या कोणत्याही वस्तूमध्ये झिंक फॉस्फाईड आढळलेले नाही. सुरुवातीला विषबाधेचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, या अहवालामुळे त्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आता हत्या, हत्या करून आत्महत्या, सामूहिक आत्महत्या किंवा अपघाती मृत्यू या सर्व शक्यतांचा नव्याने तपास केला जाणार आहे. याशिवाय आर्थिक व्यवहार आणि कौटुंबिक परिस्थिती यांचाही तपास सुरू असल्याचे समजते.

दरम्यान, मृतांपैकी झैनब हिचा शवविच्छेदन अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसून कुटुंबातील सदस्यांच्या मोबाईल फोनची सायबर तपासणीही सुरू आहे. या अहवालांनंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणातील अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित असून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Watermelon Death Case Takes Major Twist; Forensic Report Finds No Trace of Poison

महत्वाच्या बातम्या