विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sharad Pawar देशभरातील सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा आणखी एक मोठा फटका बसला असून, केंद्र सरकारने घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ केली आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर अतिरिक्त ताण पडणार आहे. दरवाढीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत सत्ताधाऱ्यांना याची राजकीय किंमत मोजावी लागेल, असा इशारा दिला आहे.Sharad Pawar
शरद पवार यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “हे असंच चालणार का? गॅसचे दर सातत्याने वाढवले जात आहेत. या वाढत्या महागाईचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या संसारावर होत आहे. सुरुवातीला महागाई नियंत्रणात असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र जनतेला टप्प्याटप्प्याने महागाईचे धक्के देणे हेच सरकारचे धोरण बनले आहे. या निर्णयांची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळी नक्कीच कळेल.”Sharad Pawar
ही दरवाढ १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरवर लागू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी मोठी वाढ आहे. यापूर्वी ७ मार्च रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ करण्यात आली होती. नव्या वाढीनंतर मुंबईमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा दर ९१२.५० रुपयांवरून ९४१.५० रुपयांवर पोहोचला आहे. तर दिल्लीत हा दर ९१३ रुपयांवरून ९४२ रुपयांपर्यंत वाढला आहे.
घरगुती गॅसप्रमाणेच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. १ जून रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी १९ किलोच्या कमर्शियल सिलिंडरच्या दरात ४२ रुपयांची वाढ जाहीर केली होती. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि लघुउद्योगांवरील खर्चही वाढला आहे. गेल्या पाच महिन्यांत व्यावसायिक सिलिंडरचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला १९ किलोच्या सिलिंडरचा दर १,५८० रुपये होता. तो आता ३,११३.५० रुपयांवर पोहोचल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या वाढत्या किमतींमुळे नागरिक आधीच आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यातच घरगुती गॅसच्या दरवाढीने मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांचे आर्थिक गणित आणखी बिघडण्याची शक्यता आहे. तेल कंपन्यांना प्रत्येक घरगुती सिलिंडरमागे सुमारे ७०३ रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे आगामी काळात एलपीजी गॅसच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
गॅस दरवाढीच्या निर्णयावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली असून, महागाईचा प्रश्न आगामी काळात राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
Sharad Pawar slams LPG price hike; says government will pay t
price for rising inflation
महत्वाच्या बातम्या