विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chhatrapati Shivaji Maharaj छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त इस्रायलने भारताशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांना अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. इस्रायलच्या मुंबईतील महावाणिज्य दूतावासाने इस्रायलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला असून, या उपक्रमासाठी महाराष्ट्र सरकारचे सहकार्य मागितले आहे.Chhatrapati Shivaji Maharaj
मुंबईतील इस्रायलचे महावाणिज्य दूत यानिव रेवाच यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रस्तावाची माहिती दिली आहे. पत्रात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.Chhatrapati Shivaji Maharaj
यानिव रेवाच यांनी पत्रात नमूद केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक इस्रायल दौऱ्यानंतर दोन्ही देशांतील जनतेमध्ये अधिक जवळीक निर्माण करण्यासाठी इस्रायल सरकार प्रयत्नशील आहे. मुंबईत कार्यरत असताना त्यांनी मराठा साम्राज्याचा इतिहास अभ्यासला असून छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्व, सुशासन, शौर्य, धार्मिक सहिष्णुता, सागरी सामर्थ्य आणि प्रजेसाठीचे समर्पण यामुळे ते प्रभावित झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
“भारतभर प्रवास करताना मला लोकांच्या मनात इस्रायल आणि आमच्या राष्ट्रीय नायकांविषयी असलेला आदर दिसून येतो. त्याचप्रमाणे इस्रायलमध्येही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अधिक जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. या मैत्रीच्या भावनेतून इस्रायलमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,” असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
इस्रायलमध्ये उभारला जाणारा हा पुतळा भारत आणि इस्रायलमधील घनिष्ठ संबंधांचे प्रतीक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र आणि भारतीय ज्यू समाज यांच्यातील ऐतिहासिक संबंधांचा उल्लेख करत, या समुदायाच्या वंशजांचे आज इस्रायली समाजातील योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रकल्पासाठी ऐतिहासिक संदर्भ, कलात्मक मार्गदर्शन, रचना आणि इतर आवश्यक बाबींमध्ये महाराष्ट्र सरकारने सहकार्य करावे, अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. भविष्यात हा प्रकल्प लोकसहभागातून राबविण्याचीही संकल्पना असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले.
या उपक्रमामुळे महाराष्ट्र आणि इस्रायल यांच्यातील मैत्री अधिक दृढ होईल तसेच शौर्य, नेतृत्व आणि परस्पर सन्मान या समान मूल्यांना अभिवादन करणारे हे स्मारक ठरेल, असा विश्वास इस्रायलच्या महावाणिज्य दूतांनी व्यक्त केला आहे.
Israel Plans Statue of Chhatrapati Shivaji Maharaj, Seeks Maharashtra Government’s Support
महत्वाच्या बातम्या