विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने सोने तस्करीविरोधात एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. तब्बल 5 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या सोने तस्करी प्रकरणात भाजपच्या कामगार संघटनेचा चिटणीस अजित आचरेकर याच्यासह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईत भारतीय जनता पक्षाच्या कामगार संघटनेच्या एका महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. डीआरआयने या आरोपींकडून ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे सोने आणि इतर संशयास्पद मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डीआरआयच्या पथकाने काल पहाटे सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास मुंबई विमानतळ परिसरात ही कारवाई केली. विमानतळावरील संशयास्पद हालचालींवरून अधिकाऱ्यांनी या पाच जणांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांची सखोल झडती आणि तपास केला असता, हा कोट्यवधी रुपयांच्या सोने तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अजित आचरेकर, रोहित कुमार सिंग, संतोष सुभाष, समीमुल्ला शहा, हमीद लेबेरीफखान, फलिल मोहम्मद कासिम यांचा समावेश आहे.
जप्त केलेल्या सोन्याची बाजारपेठेतील किंमत ५ कोटींहून अधिक असल्याचे डीआरआयच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठी टोळी कार्यरत असण्याची शक्यता तपास यंत्रणांनी वर्तवली आहे. या तस्करीसाठी परदेशातील कोणत्या व्यक्तींचे किंवा नेटवर्कचे साहाय्य घेतले गेले होते का, याचा शोध आता घेतला जात आहे.
सध्या डीआरआयकडून सर्व पाचही आरोपींची कसून चौकशी केली जात असून, त्यांचे बँक व्यवहार, परदेश दौरे आणि कॉल डिटेल्स तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या तपासातून आणखी काही बड्या नावांचा खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी डीआरआयकडून अद्याप कोणतीही अधिकृत सविस्तर माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
या कारवाईत अटक करण्यात आलेले मुख्य आरोपी अजित आचरेकर हे भाजपच्या अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेत चिटणीस म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वीच आचरेकर यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या एका भव्य कार्यक्रमात त्यांचा हा पक्षप्रवेश झाला होता, त्यानंतर त्यांच्यावर ही कामगार संघटनेची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
Mumbai Airport Gold Smuggling Bust: Five Arrested Including BJP Leader, ₹5 Crore Gold Seized
महत्वाच्या बातम्या