विशेष प्रतिनिधी
पुणे : छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र स्मृतिस्थळाजवळ 150 हून अधिक लोक सहभागी असलेला कार्यक्रम होत असेल, तर त्याला केवळ ‘हाऊस पार्टी’ म्हणून संबोधण्याची घाई का केली जात आहे? पोलिसांच्या माहितीनुसार पार्टीमध्ये सुमारे 154 जण उपस्थित होते. मात्र गुन्हा केवळ 78 जणांविरुद्धच दाखल करण्यात आला. उर्वरित लोकांवर कारवाई का झाली नाही? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. Sushma Andhare
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेल्या पोस्टमध्ये अंधारे यांनी कारवाईतील विसंगती अधोरेखित करत, “ही रेव्ह पार्टी होती की हाऊस पार्टी?” असा सवाल उपस्थित केला. काही प्रभावशाली व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे.
जर इतक्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते, तर केवळ 29 जणांचीच वैद्यकीय किंवा ड्रग्ज चाचणी का करण्यात आली? उर्वरित लोकांची तपासणी न करण्यामागे नेमके कारण काय होते, याचे उत्तर पोलिसांनी द्यावे, अशी मागणी करत सुषमा अंधारे म्हणाल्या जर ड्रग्ज सेवन किंवा अन्य बेकायदेशीर कृत्यांचा संशय होता, तर सर्व उपस्थितांची तपासणी होणे अपेक्षित होते.
पोलिस अधिकाऱ्यांनी प्राथमिक माहितीत संबंधित कार्यक्रमासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची परवानगी घेतल्याचा दावा केल्याचे वृत्त समोर आले आहे. जर अशी परवानगी खरोखरच घेतली असेल, तर तो अधिकृत परवाना सार्वजनिक करावा. “पोलिस प्रशासनाने तो दस्तऐवज नागरिकांसमोर आणावा. त्यामुळे सर्व शंका दूर होतील, असे आव्हान अंधारे यांनी दिले.
कारवाईतून वगळण्यात आलेल्या लोकांचे राजकीय संबंध आहेत का? ते एखाद्या उद्योगपतीशी संबंधित आहेत का? की आयटी क्षेत्रातील उच्च उत्पन्न गटातील लोक असल्यामुळे त्यांना संरक्षण दिले जात आहे? या पार्टीची माहिती पोलिसांना देणाऱ्या सूत्रांनीच नंतर संपूर्ण प्रकरण व्यवस्थापित करण्याचा प्रयत्न केला का, असा सवालही अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
तुळापूर परिसरातील एका आलिशान फार्महाऊसवर पोलिसांनी छापा टाकला होता. या कारवाईत मोठ्या संख्येने युवक-युवती आढळून आल्याचे वृत्त समोर आले. दारू, हुक्का आणि अमली पदार्थांच्या वापराबाबतही संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे दाखल केले होते. मात्र कारवाईची व्याप्ती, तपासाची दिशा आणि सहभागी लोकांवरील निवडक कारवाई यावर आता प्रश्न उपस्थित होत आहेत.
सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी #उडतामहाराष्ट्र हा हॅशटॅग वापरत राज्य सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. राज्यात वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवर, पार्टी संस्कृतीवर आणि कायद्याच्या अंमलबजावणीवर विरोधक सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यातच आता तुळापूर प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे. दरम्यान, सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर या प्रकरणात पोलिस प्रशासन आणि राज्य सरकारकडून स्पष्टीकरण येते का, याकडे लक्ष लागले आहे. विशेषतः 154 उपस्थितांपैकी केवळ 78 जणांवर गुन्हा दाखल होणे, फक्त 29 जणांची तपासणी होणे आणि परवानगीच्या कागदपत्रांचा मुद्दा यामुळे तुळापूर रेव्ह पार्टी प्रकरणावरील वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
Sushma Andhare Questions Authorities
महत्वाच्या बातम्या
- Rajendra Jain : राज्यसभेसाठी राजेंद्र जैन यांना उमेदवारी; विदर्भाला प्रतिनिधित्व देण्याचा राष्ट्रवादीचा निर्णय
- NEET Student : नीट विद्यार्थिनी आत्महत्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्याला नोटीस
-
Pune water : पाणीकपातीवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता, आज महापौर आणि प्रशासनाची तातडीची बैठक
- मुंबई विमानतळावर डीआरआयची कारवाई: तस्करीप्रकरणी भाजप नेत्यासह पाच जणांना अटक, 5 कोटी रुपयांचे सोने जप्त