विदर्भाच्या जाेरावर एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्र करणार, बच्चू कडू यांचा निर्धार

विशेष प्रतिनिधी

भंडारा : पत्रिकेत नाव असो वा नसो, शिंदे लोकांच्या मनात आहेत. आगामी काळात विदर्भाच्या जोरावर एकनाथ शिंदेंनाच पुन्हा मुख्यमंत्री करणार, असा निर्धार बच्चू कडू यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत फसवणूक झाल्यास सरकारविरोधात अधिवेशनात तसेच थेट रस्त्यावर लढायला तयार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. Bachchu Kadu

बच्चू कडू म्हणाले, “प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा ही भावना असणे स्वाभाविक आहे. आमचीही इच्छा आहे की ‘देवाभाऊंचे’ वरच्या पदावर प्रमोशन व्हावे आणि एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत. गेल्या १५-२० दिवसांत आम्ही विदर्भाचा दौरा केला आहे, येथील जनता एकनाथ शिंदेंच्या पाठीशी उभी राहून त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करेल, अशी मला खात्री आहे. यासाठी शिवसैनिकांनी आता शांत बसून चालणार नाही.”

विदर्भातील मुख्यमंत्र्यांकडून या भागाला ज्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. सरकार कामच करत नाही असे आमचे म्हणणे नाही; नदीजोड प्रकल्पातून पाणी जेव्हा यायचे तेव्हा येईल, पण आजच्या घडीला शेतकऱ्यांच्या तातडीच्या गरजा पूर्ण होणे गरजेचे आहे,” असे कडू म्हणाले.



शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी बच्चू कडू यांनी नागपुरात मोठे जनआंदोलन केले होते, ज्यावर सरकारने पूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, आता सरकारकडून शेतकऱ्यांची बोळवण होत असल्याचा आरोप शेतकरी संघटना करत आहेत. यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, “कर्जमाफीत शेतकऱ्यांची पूर्ण फसगत होत आहे असे नाही, अनेकांना लाभही मिळत आहे. मात्र, योजनेत काही तातडीच्या दुरुस्त्या करणे आवश्यक आहे. या दुरुस्त्यांसाठी आम्ही लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत. चालू अधिवेशनातही आम्ही हा आवाज उठवू आणि तरीही सरकारने निर्णय घेतला नाही, तर आम्ही थेट रस्त्यावर उतरून लढायला तयार आहोत.”

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेतून एकनाथ शिंदे यांचे नाव वगळण्यात आल्याच्या वादावरही बच्चू कडू म्हणाले, “एकनाथ शिंदे यांना जेवढे डावलण्याचा प्रयत्न केला जाईल, तेवढे ते अधिक वेगाने लोकांच्या मनात घर करतील. तुम्ही त्यांचे नाव पत्रिकेवर लिहा अथवा लिहू नका, एकनाथ शिंदे हे जनतेच्या मनातील नेते आहेत .

२०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत दगाफटका झाला होता. त्यामुळे दगा फटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजप स्वतंत्र लढण्याची तयारी करत आहे, तर आम्हीही तयारी करत आहोत, असा दावा कडू यांनी केला.

With Vidarbha’s Support, Eknath Shinde Will Become Chief Minister Again, Vows Bachchu Kadu

महत्वाच्या बातम्या