विशेष प्रतिनिधी
मुंबई :Rajendra Jain राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी विदर्भातील ज्येष्ठ नेते राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना राज्यसभेचे सदस्यत्व सोडावे लागले होते. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर कोणाला संधी मिळणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू होती.Rajendra Jain
मुंबईतील देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राजेंद्र जैन यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली. त्यांनी सांगितले की, पक्षाने सर्व पर्यायांचा सखोल विचार करून आणि महायुतीतील समन्वय साधून हा निर्णय घेतला आहे.Rajendra Jain
तटकरे म्हणाले की, “राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक होत असल्याने पक्षाने एकमताने राजेंद्र जैन यांना अधिकृत उमेदवार म्हणून निश्चित केले आहे. त्यांनी भंडारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेत तब्बल १२ वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच विविध सहकारी संस्था, मध्यवर्ती बँका आणि फेडरेशनमध्ये त्यांनी दीर्घकाळ काम करत संघटनात्मक अनुभव मिळवला आहे.”
र्भाला न्याय देण्याचा प्रयत्न
राजेंद्र जैन यांची निवड करताना विदर्भाला प्रतिनिधित्व देण्याचा विचार महत्त्वाचा ठरल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील नेत्यांना मोठ्या प्रमाणात संधी मिळाली असली, तरी विदर्भातील कार्यकर्त्यांना राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व मिळावे, अशी भावना पक्षामध्ये अनेक दिवसांपासून होती. त्याच पार्श्वभूमीवर जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव सर्वाधिक चर्चेत होते. भुजबळ राज्यसभेवर जाण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर आली होती. तसेच त्यांना राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद मिळावे, अशीही पक्षांतर्गत मागणी असल्याचे बोलले जात होते.
याबाबत विचारले असता सुनील तटकरे यांनी भुजबळांच्या योगदानाचा गौरव केला. ते म्हणाले, “छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे १९९९ पासूनचे संस्थापक नेते आहेत. पक्ष उभारण्यात आणि आजपर्यंतच्या वाटचालीत त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव आणि नेतृत्व क्षमता पक्षासाठी दिशादर्शक आहे.”
तटकरे यांनी पुढे सांगितले की, पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच भविष्यातील निर्णय घेतले जातील. भुजबळ यांच्या ज्येष्ठत्वाचा आणि अनुभवाचा योग्य सन्मान केला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
नवनीत राणा यांच्या नावाचीही चर्चा
दरम्यान, राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी भाजप नेत्या नवनीत राणा यांचे नावही चर्चेत आले होते. त्यांनी अलीकडेच सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याने त्यांना राज्यसभेची संधी मिळू शकते, अशी राजकीय चर्चा रंगली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून पक्षाने राजेंद्र जैन यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब केले आहे.
महायुतीत समन्वयाचे संकेत
राजेंद्र जैन यांच्या उमेदवारीमुळे महायुतीतील समन्वय अधिक मजबूत झाल्याचे मानले जात आहे. राज्यसभेच्या या निवडणुकीत महायुतीकडे स्पष्ट संख्याबळ असल्याने जैन यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यामुळे विदर्भाला राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व मिळण्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक विस्तारालाही या निर्णयामुळे चालना मिळणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
NCP nominates Rajendra Jain for Rajya Sabha; party opts to give representation to Vidarbha
महत्वाच्या बातम्या