विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात वाढत चाललेल्या बेकायदेशीर रेव्ह पार्ट्या, अंमली पदार्थांची विक्री आणि अशा पार्ट्यांमधील मृत्यूंच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना नेत्या तथा माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांना निवेदन सादर करून रेव्ह पार्टी प्रकरणांची विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत चौकशी करण्याची तसेच मुख्य सूत्रधारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.Neelam Gorhe
पुणे पोलिसांनी नुकत्याच तुळापूर येथील एका आलिशान फार्महाऊसवर छापा टाकून ‘प्रोजेक्ट एक्स’ नावाच्या हाय-प्रोफाइल रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला होता. या कारवाईत मोठ्या प्रमाणात मद्यसाठा, प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स आणि गांजा जप्त करण्यात आला. या पार्टीत तब्बल १५६ तरुण-तरुणी सहभागी असल्याचे उघड झाले असून त्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, आयटी क्षेत्रातील कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील व्यावसायिकांचा समावेश होता.
डॉ. गोऱ्हे यांनी निवेदनात म्हटले आहे की, सोशल मीडियाच्या माध्यमातून गुप्तपणे आयोजित केल्या जाणाऱ्या अशा पार्ट्यांचे प्रमाण वाढत असून त्या आता शहरांमधून ग्रामीण भागातील फार्महाऊस, रिसॉर्ट्स आणि खाजगी व्हिलांकडे स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे पुणे, मुंबई, ठाणे, लोणावळा, मुळशी, कर्जत आणि वाघोली परिसरात विशेष तपास मोहीम राबविण्याची गरज आहे.
मुंबईतील काही पार्टींमध्ये झालेल्या मृत्यूंचा संदर्भ देत त्यांनी या घटनांमागे मद्य आणि अंमली पदार्थांचे मिश्रण कारणीभूत होते का, याची सखोल चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली. तरुणांच्या मृत्यू किंवा प्रकृती बिघडण्यामागील नेमकी कारणे शोधून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, असेही त्यांनी नमूद केले.
डॉ. गोऱ्हे यांनी पोलिसांनी तातडीने एफआयआर नोंदवून रेव्ह पार्टी आयोजक, ड्रग्ज पुरवठादार आणि मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचावे, अशी मागणी केली आहे. अंमली पदार्थांचा व्यापार हा संघटित गुन्हेगारीचा भाग असल्याने एनडीपीएस कायद्यांतर्गत कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच त्यांनी सात प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये विशेष तपास पथकाची स्थापना, मुख्य आरोपींवर एमपीडीए अंतर्गत कारवाई, ड्रग्ज पुरवठा साखळीचा तपास, ग्रामीण भागातील रिसॉर्ट्स आणि फार्महाऊसचे विशेष ऑडिट, सोशल मीडियावरील संशयास्पद नेटवर्कवर सायबर पाळत, बेकायदेशीर कृत्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या मालमत्तांची जप्ती आणि मजबूत दोषारोपपत्राद्वारे दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्याचा समावेश आहे.
राज्यातील युवा पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यातून वाचविण्यासाठी राज्यव्यापी जनजागृती आणि विशेष मोहीम राबविण्याची गरज असल्याचे मतही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
Neelam Gorhe Demands SIT Probe into Rave Party Cases, MPDA Action Against Masterminds
महत्वाच्या बातम्या