विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे शहरावर पाणीटंचाईचे संकट गडद होत असून येत्या आठवडाभरात पाणीकपात करावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पिण्याच्या वापरासाठी केवळ 3 टीएमसी पाणी शिल्लक असल्याची माहिती पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महापौरांनी सांगितले की, शहरातील पाणीस्थितीचा सविस्तर अहवाल पुढील दोन दिवसांत प्रशासनाकडून सादर केला जाणार आहे. त्यानंतर पाणीकपातीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. प्रशासनाला आवश्यक नियोजनासाठी मुदत देण्यात आली असून सोमवारपर्यंत तयारी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरातील वॉशिंग सेंटर, स्विमिंग टँक आणि इतर बिगर अत्यावश्यक वापरासाठी होणाऱ्या पाण्याच्या वापरावर निर्बंध आणण्याचाही विचार सुरू आहे. यासाठी महापालिकेकडून ‘सेव्ह वॉटर कॅम्पेन’ राबविण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्तांनीही पाणीकपातीची गरज असल्याचे स्पष्ट करत, परिस्थिती कायम राहिल्यास एका आठवड्यात पाणीपुरवठ्यात कपात करावी लागेल, असे म्हटले आहे. तसेच शहरात कोणत्या भागात पाण्याची कमतरता अधिक आहे, याचा आढावा घेऊन समप्रमाणात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले जाणार आहे.
सध्या खडकवासला धरण समूहात सुमारे 5 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असला तरी त्यापैकी केवळ 3 टीएमसी पाणी पिण्याच्या वापरासाठी शिल्लक आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर बनली असून आवश्यकतेनुसार एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा पर्यायही प्रशासनाच्या विचाराधीन आहे.
पुणेकरांना संभाव्य पाणीकपातीसाठी तयारी करण्याचे आवाहन करताना महापौर नागपुरे यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.
Pune May Face Water Cuts Within a Week; Only 3 TMC Drinking Water Left, Says Manjusha Nagpure
महत्वाच्या बातम्या