विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील ड्रग्सविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी माहिती देणाऱ्यांना प्रोत्साहन दिले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. ड्रग्स तस्करी किंवा विक्रीबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तींना बक्षीस दिले जाईल आणि त्यांची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ड्रग्स माफियांविरोधातील लढाईत नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
विधानसभेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील ड्रग रॅकेटमध्ये काही पोलिसांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे स्पष्ट केले. ड्रग्स तस्करी किंवा रॅकेटमध्ये कोणत्याही पोलिसाचा सहभाग आढळल्यास त्याच्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगत सरकार ड्रग्सविरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण राबवत असल्याचे फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केले.
ड्रग्सविरोधातील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार अमली पदार्थांविरोधात कठोर भूमिका घेत असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही ड्रग्स तस्करांवर कारवाई करण्यात आली असून जनजागृतीसाठी विशेष मोहिमाही राबवण्यात आली आहे. ज्या ठिकाणी ड्रग्स आणि नार्कोटिक्सची विक्री केली जाते, त्या अड्ड्यांवर उद्ध्वस्त करण्याची कारवाई सुरू असून हे संपूर्ण साम्राज्य नष्ट करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.
विधानसभेत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी राज्यातील वाढत्या अमली पदार्थांच्या समस्येवर चिंता व्यक्त केली. राज्यातून ड्रग्सचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ड्रग्सची विक्री करणारे आणि सेवन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. युवकांचे भवितव्य वाचवण्यासाठी सरकारने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असेही ते म्हणाले.
Citizens to join fight against drugs, informants on trafficking to be rewarded: Chief Minister
महत्वाच्या बातम्या