समृद्धी महामार्गावर ट्रकची कारला धडक ;दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृत्यू

विशेष प्रतिनिधी

वर्धा :- समृद्धी महामार्गावर Samruddhi Mahamarg वर्ध्याजवळील विरुळ भागात एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघात घडला आहे. आयशर ट्रक आणि स्विफ्ट डिझायर कारमध्ये झालेल्या जोरदार धडकेनंतर कारने पेट घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या अपघातात एकूण ५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

मुलीच्या ॲडमिशनचा आनंद क्षणात मावळला

मिळालेल्या माहितीनुसार, मृत पावलेले कारमधील चौघेही वर्धा जिल्ह्यातील सालोड हिरापूर येथील रहिवासी होते. कुटुंबातील जुळ्या मुलींपैकी एका मुलीच्या इंजिनिअरिंग प्रवेशासाठी हे कुटुंब पुण्याला गेले होते. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ॲडमिशन घेतलेली मुलगी पुण्यातच थांबली, तर आई-वडील, दुसरी मुलगी आणि चालक कारने वर्ध्याकडे परत येत होते. मात्र, वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. जुळ्या बहिणींपैकी एका बहिणीचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सालोड गावावर शोककळा पसरली आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी जाहिरात, होर्डिंग, उत्सव नको! पक्षातर्फे आवाहन


अपघात कसा घडला?

अपघाताच्या काही वेळापूर्वी घटनास्थळाजवळ इथेनॉलचा एक टँकर उलटला होता. सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी महामार्गाची एक बाजू बंद करून एकेरी वाहतूक सुरू केली होती. एकेरी वाहतूक सुरू असताना मागून येणाऱ्या भरधाव मालवाहू आयशर ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि तो थेट पुढे असलेल्या कारवर जाऊन आदळला. धडक इतकी भीषण होती की अपघातानंतर कारने क्षणात पेट घेतला. कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही आणि आतच होरपळून चौघांचा अंत झाला. घटनेची माहिती मिळताच पुलगाव पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य राबवले.Samruddhi Mahamarg

पोलिसांनी काय दिली माहिती?

वर्धा पोलिस अधीक्षक, सौरभकुमार अग्रवाल, यांनी माहिती देताना सांगितलं की, “काल रात्री पुलगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये समृद्धी महामार्गावर एक इथेनॉलचा टँकर पलटी झाला होता. तो नागपूरवरून येत होता. त्यामुळे त्या बाजूची जी रहदारी व्यवस्था आहे ती विस्कळीत झाली होती. दुसऱ्या बाजूने टप्प्याटप्प्याने दोन्ही बाजूची रहदारी सोडणे सुरू होते. त्यादरम्यान एक कारला मागून आयशर ट्रकने धडक दिली, त्यामध्ये एकूण सहा लोकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये कारमध्ये चौघांचा आणि ट्रकमधील दोघांचा समावेश आहे.

मन हेलावून टाकणारी घटना – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

वर्धा जिल्ह्यातील विरुळ गावाजवळ समृद्धी महामार्गावर झालेली भीषण दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. या अपघातात निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना मन हेलावून टाकणारी आहे. या दुःखद घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीनं मदतकार्य हाती घेतले असून, जखमींना आवश्यक ते उपचार मिळावेत तसंच बाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन तयार आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. असे म्हणत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी श्रदांजली अर्पण केली.

Truck collides with car on Samruddhi Mahamarg; 5 people, including both drivers, killed.

महत्वाच्या बातम्या