Pune: स्विफ्ट घेण्यासाठी पुण्यातील दोघांचा मोठा कारनामा; धक्कादायक सत्य कळताच पोलीसही चक्रावले!

विशेष प्रतिनिधी

पुणे: मारुती स्विफ्ट कार घेण्याच्या हौसेपोटी दोन तरुणांनी शहरभरात महागड्या दुचाकी चोरण्याचा सराईत धंदा चालवला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पण अखेर पोलिसांनी या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून बुलेट आणि केटीएमसारख्या महागड्या गाड्यांसह तब्बल 5 लाख रुपयांच्या एकूण 8 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. ( Pune Crime )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सागर शेळके आणि करण धुमाळ अशी आहेत. या दोघांनाही स्विफ्ट कार खरेदी करण्याची प्रचंड हौस होती. पण त्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने त्यांनी गुन्हेगारीचा रस्ता निवडला. या दोघांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला लक्ष्य केले होते. या परिसरातून महागड्या बुलेट, केटीएमसह विविध दुचाकी चोरून त्यांनी पैसे उभारण्याचा कट आखला. मात्र लक्ष्मीनगर पोलिसांनी या प्रकरणी वेगाने तपासाची चक्रे फिरवली.

150 सीसीटीव्ही फुटेजमुळे लागला छडा
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या चोऱ्यांचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तब्बल 150 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. या सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर या दोघांची ओळख पटली. मग पोलिसांनी सापळा रचून या दोघांना जेरबंद केले. त्यांच्याकडून 8 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत, ज्यांची एकूण किंमत 5 लाख रुपये आहे.



दरम्यान, आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी कारच्या हौसेपोटी हे गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात दाखल असलेले दुचाकी चोरीचे तब्बल 8 गंभीर गुन्हे एकाच वेळी उघडकीस आले आहेत. या दोघांनी आणखी कुठे अशा चोऱ्या केल्या आहेत का, याचा पुढील सखोल तपास पोलीस करत आहेत. पण हौसेला मोल नाही’ असं आपण अनेकदा म्हणतो आणि ऐकतो. एखादी हौस पूर्ण करण्यासाठी काही लोक इतके खालच्या पातळीवर जाऊ शकतात, याचे धक्कादायक उदाहरण पुण्यात समोर येताच आश्चर्य व्यक्त होत आहे.

Pune: Two men from Pune pull off a major stunt to get a Swift; the police were left stunned upon discovering the shocking truth!

महत्वाच्या बातम्या