विशेष प्रतिनिधी
नाशिक:- Nashik नाशिक रोड परिसरातील जेलरोड भागात एका पतीने आपल्या पत्नीवर आणि अवघ्या 7 वर्षांच्या चिमुकल्यावर धारदार शस्त्राने वार केले आणि संशयित पतीने स्वतःही विषारी औषध प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आल्याने संपूर्ण नाशिक शहरात तीव्र खळबळ उडाली आहे.
अश्विनी किरण हजारे (वय 43) आणि सुयंश किरण हजारे (वय 7) अशी या घटनेत प्राण गमावलेल्या मायलेकाची नावे आहेत. तर संशयित पती किरण एकनाथ हजारे (वय 54) याच्यावर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सोमवारी सकाळी किरण हजारे यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्याने शेजाऱ्यांच्या ही घटना लक्षात आली. घरात आत जाऊन पाहिले असता अश्विनी आणि सुयंश हे दोघे रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळले, तर किरण हजारे हा विषारी औषध सेवन केल्यामुळे गंभीर अवस्थेत पडलेला होता. स्थानिकांनी तातडीने नाशिकरोड पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत किरणला तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे .
आईला वाचवताना चिमुकल्याने गमावला जीव
मिळालेल्या माहितीनुसार, किरण आणि अश्विनी यांचा हा दुसरा विवाह होता. रविवारी रात्री किरण हा पत्नी आणि मुलासह सासुरवाडीला जेवणासाठी गेला होता. तेथून रात्री परतल्यानंतर तिघेही आपापल्या खोलीत झोपले. मात्र, सोमवारी पहाटेच्या सुमारास किरणने अचानक पत्नी अश्विनीवर धारदार चाकूने हल्ला चढवला असता वडील आपल्या आईवर चाकूने वार करत असल्याचे पाहून घाबरलेल्या 7 वर्षांचा चिमुकला सुयंश आईच्या बचावासाठी मध्ये पडला. मात्र, निर्दयी बनलेल्या किरणने सुयंशच्या गळ्यावरही चाकू फिरवला. या दुर्दैवी घटनेत आई आणि मुलगा दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
आर्थिक अडचणीतून टोकाचे पाऊल
प्राथमिक तपासात किरण हजारे याने आर्थिक अडचणीतून हे अत्यंत टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या घटनेमागे आणखी काही कौटुंबिक अथवा अन्य कारणे आहेत का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या घटनेप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित पतीची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याची अधिक चौकशी केली जाणार आहे. एकाच घरातील या दुहेरी घटनेमुळे परिसरात अत्यंत हळहळ व्यक्त केली जात आहे.
Nashik Shaken! Husband Takes Lives of Wife and Son
महत्वाच्या बातम्या
- Dr Kumar Saptarshi : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी जाहिरात, होर्डिंग, उत्सव नको! पक्षातर्फे आवाहन
- पुण्याची वाहतूककोंडी फोडणार तीन महामार्ग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- आपलं म्हणणं खरं करणं यालाच हुकूमशाही म्हणतात, उद्धव ठाकरे यांची टीका