अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, रोहित पवार यांनी व्यक्त केला संशय

विशेष प्रतिनिधी

नाशिक : भीषण अपघातात ‘शिवनिका ट्रस्ट’चे उपाध्यक्ष आणि अशोक खरात याचे अत्यंत निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजूनही पुढं न आलेले भोंदूचे इतर काही कारनामे पुढं येऊ नयेत आणि यामध्ये कुणीतरी अडचणीत येऊ नये, म्हणून तर हा अपघात घडवून आणला नाही ना, अशी शंका येते, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. Jitendra Shelke

समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने जात असताना धोत्रे गावाजवळ उभ्या असलेल्या कंटेनरला कारने पाठीमागून भीषण धडक दिली. या भीषण अपघातात जितेंद्र शेळके यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शेळके आपल्या कुटुंबासह कारने प्रवास करत होते. धोत्रे गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरचा अंदाज न आल्याने त्यांची कार थेट कंटेनरच्या मागील भागात घुसली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा चक्काचूर झाला.



या अपघातात जितेंद्र शेळके यांचा मुलगा आणि पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर मुलाला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांची पत्नी बराच वेळ कारमध्ये अडकलेली होती, त्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू होते.

जितेंद्र शेळके हे गेल्या काही दिवसांपासून लैंगिक शोषण आणि अनेक बड्या नेत्यांना, अधिकाऱ्यांना लुबाडल्याने चर्चेत आलेल्या अशोक खरातचे अत्यंत विश्वासू मानले जात होते. खरात याच्या ‘शिवनिका ट्रस्ट’चे ते उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. याशिवाय, शेळके यांच्या मालकीच्या लॉन्समध्येही खरात याची भागीदारी असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून खरातला अटक झाल्यापासून जितेंद्र शेळके मोठ्या मानसिक तणावाखाली होते, अशी माहिती समोर येत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अपघाताबाबत शंका व्यक्त केली आहे. शिवनिका संस्थानचे उपाध्यक्ष आणि भोदू अशोक खरात याचे सहकारी जितेंद्र शेळके यांचं अपघाती झालेलं निधन अतिशय धक्कादायक आहे. अजूनही पुढं न आलेले भोंदूचे इतर काही कारनामे पुढं येऊ नयेत आणि यामध्ये कुणीतरी अडचणीत येऊ नये, म्हणून तर हा अपघात घडवून आणला नाही ना, अशी शंका येते. या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे. तसंच भोंदू खरातच्या चौकशीतही अनेक बाबी पुढं येणार असल्याने त्याच्याही सुरक्षेची काळजी घ्यावी, असे म्हटले आहे.

Jitendra Shelke, close aide of Ashok Kharat, dies in accident; Rohit Pawar raises suspicion

महत्वाच्या बातम्या