विधान परिषदेच्या ९ जागांसाठी १२ मे रोजी मतदान; महायुतीला ८ जागांचा अंदाज

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ जागांसाठी येत्या १२ मे रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला असून, या निवडणुकीत महायुतीकडून जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्याची जोरदार तयारी सुरू आहे. Maharashtra Legislative Council Polls

जाहीर कार्यक्रमानुसार, २३ एप्रिल रोजी अधिसूचना जारी होईल. त्यानंतर ३० एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. २ मे रोजी अर्जांची छाननी होणार असून, ४ मे हा अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असेल. १२ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

१३ मे रोजी विधान परिषदेतील ९ सदस्यांची मुदत संपत आहे. यात संजय केणेकर, रणजितसिंह मोहिते पाटील, उद्धव ठाकरे, नीलम गोहे, संदीप जोशी, दादाराव केचे, अमोल मिटकरी, राजेश राठोड आणि शशिकांत शिंदे यांचा समावेश आहे.



महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्यसंख्या ७८ असून, त्यातील ३० सदस्यांची निवड विधानसभा सदस्यांमार्फत केली जाते. यापैकी ९ जागा यावेळी रिक्त होत आहेत.

सध्याच्या आमदारांच्या संख्याबळाचा विचार करता, या निवडणुकीत महायुतीला ८ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर महाविकास आघाडीला केवळ १ जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे विरोधकांना जागा मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार का याबाबत अद्याप स्पष्टता नाही. जरी त्यांची उमेदवारी संभवत असली, तरी महाविकास आघाडीत एका जागेसाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. काँग्रेसनेही त्या एकमेव जागेवर दावा ठोकल्यास आघाडीत पेच निर्माण होऊ शकतो.

दुसरीकडे, भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे असलेल्या अतिरिक्त मतांच्या बळावर महायुतीची आठवी जागा देखील सहज मिळू शकते.

Maharashtra Legislative Council Polls on May 12 for 9 Seats; Mahayuti Likely to Win 8

महत्वाच्या बातम्या