‘गद्दारांच्या मतदारसंघात जाऊन जनतेची माफी मागणार’; उद्धव ठाकरेंचा बंडखोर खासदारांवर घणाघात

विशेष प्रतिनिधी

यवतमाळ : शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी पक्षांतर करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांविरोधात थेट रणशिंग फुंकले आहे. विदर्भ दौऱ्याची सुरुवात करताना यवतमाळ येथील सभेत त्यांनी बंडखोर खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला. “शिवीगाळ करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. पण माझ्या विश्वासावर आणि माझ्या प्रचारामुळे निवडून आलेले खासदार जनतेचा कौल पायदळी तुडवून निघून गेले. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात जाऊन तेथील मतदारांची माफी मागण्यासाठी मी आलो आहे,” असे भावनिक उद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले.

पक्षांतर केलेल्या खासदारांवर निशाणा साधत ते म्हणाले, जनतेने मशाल चिन्हावर आणि शिवसेनेच्या विचारांवर विश्वास ठेवून मतदान केले होते, मात्र निवडून आल्यानंतर त्या विश्वासाचा विश्वासघात करण्यात आल्याचा आरोप केला. जनतेच्या मतांचा अपमान करणाऱ्यांना जनता योग्य वेळी धडा शिकवेल.



शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राज्य सरकारवर टीका करत ठाकरे म्हणाले, “आज राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही. मात्र आमच्या भरवशावर निवडून आलेल्या गद्दार खासदारांना ‘खोक्यांच्या’ स्वरूपात भरघोस हमीभाव मिळाला. त्यांना पैसे मिळाल्याचे त्यांनी स्वतःच जाहीरपणे मान्य केले आहे.” राज्यातील शेतकरी, बेरोजगार आणि सर्वसामान्य नागरिक अडचणीत असताना सत्ताधाऱ्यांना केवळ सत्तेचे राजकारण महत्त्वाचे असल्याचा आरोपही त्यांनी केला.

लोकसभा निवडणुकीनंतर सहा खासदारांच्या पक्षांतरामुळे शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेली नाराजी दूर करण्यासाठी आणि संघटनेत नवचैतन्य निर्माण करण्याच्या उद्देशाने उद्धव ठाकरे यांनी हा दौरा हाती घेतला आहे. यवतमाळनंतर ते वाशीम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी येथे सभा घेऊन बंडखोर खासदारांविरोधात जनमत तयार करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

या दौऱ्याच्या माध्यमातून पक्षसंघटना बळकट करणे, निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे आणि बंडखोरांविरोधात थेट जनतेच्या न्यायालयात जाण्याचा संदेश उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्यांच्या या दौऱ्यामुळे विदर्भासह राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे.

Uddhav Thackeray launches attack on defectors

 

महत्वाच्या बातम्या