शिक्षण सेवकाला पदोन्नती देण्यासाठी तीन लाखांची लाच मागणाऱ्या लाचखोर अधिकाऱ्यांना पकडले

विशेष प्रतिनिधी

पुणे : जिल्हा परिषद शिक्षण विभागातील पदोन्नतीसाठी तीन लाख रुपयांची लाच मागणाऱ्या तिघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करीत या लाचखोरांना २ लाख ७५ हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कनिष्ठ सहायक अनिल पोपट रंधवे (वय ३२, रा. एच ३०१, रॉयल रहाडगी ग्रीन फेज १, शिवराज नगर, काळेवाडी, पिंपरी चिंचवड, मूळ रा. भांबोरा, कर्जत, अहिल्यानगर), सहाय्यक प्रशासन अधिकारी राजेश श्रीराम खंदारे (वय ५२, रा. फ्लॅट नंबर बी२/१००३, गोदरेज ग्रीन सोसायटी, उंड्री, मूळ रा. जवळा बुद्रुक, शेगाव, बुलढाणा), कनिष्ठ सहाय्यक अतिश केरू शिंदे (वय ४०, रा. फ्लॅट नंबर ३०३, भैरवनाथ कॉम्प्लेक्स, मोहम्मदवाडी, मूळ रा. वाडेबोल्हाई, हवेली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ३६ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.

तक्रारदार हे शिक्षण सेवक असून उपशिक्षक पदावर पदोन्नतीसाठी गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती वेल्हे यांच्या मार्फतीने तक्रारदाराच्या पदोन्नतीचा प्रस्ताव शिक्षण विभाग जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे पाठवण्यात येणार होता. त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने तक्रारदार यांनी जिल्हा परिषद पुणे येथील शिक्षण विभागाचे अधीक्षक खंदारे यांची दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी भेट घेतली. त्यांनी तक्रारदार यांना शिक्षण सेवक पदावरून उपशिक्षक पदावर पदोन्नती देताना जात वैधता प्रमाणपत्र नसले तरी आधीसंख्य पदावर वर्ग करून घेतो व इतर सेवाविषयक व सेवानिवृत्ती विषयक लाभ मिळवून देता येतील असे सांगितले. तशी शिफारस करून तक्रारदाराचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्याकरता शिक्षण विभागातील अधीक्षक खंदारे यांनी तक्रारदाराकडे त्यांच्या स्वतःसाठी व वरिष्ठांसाठी ३ लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली.



अधिसंख्य पदावर वर्ग करून घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयातील रंधवे हे सांगतील, त्या नमुन्यात प्रस्ताव तयार करून त्यावर गटशिक्षणाधिकारी वेल्हे यांची शिफारस घेऊन तो प्रस्ताव समक्ष घेऊन येण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी रंधवे यांनी सांगितल्याप्रमाणे प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती वेल्हे यांच्याकडे जमा केला. त्या प्रस्तावावर गटशिक्षण अधिकारी यांची शिफारस घेऊन तो प्रस्ताव दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषद पुणे येथे जमा केला. मात्र, त्यांना लाच द्यायची नसल्यामुळे त्यांनी याविषयी ६ जानेवारी २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी करण्यात आली. तेव्हा खंदारे व रंधवे यांनी तक्रारदाराच्या वरील कामासाठी तक्रारदाराकडे तीन लाख रुपयाची मागणी करून तक्रारदाराकडून यापूर्वीच पंचवीस हजार रुपये लाच स्वीकारल्याचे मान्य करून उर्वरित २ लाख ७५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

या लाच मागणीच्या अनुषंगाने दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी बी. टी. कवडे रस्त्यावरील एव्हेन्यू मॉल येथे सापळा लावण्यात आला. या कारवाईदरम्यान रंधवे व शिंदे या दोघांनी तक्रारदाराकडून २ लाख ७५ हजार रुपये लाच स्वीकारली. त्यांना तात्काळ जागेवरच रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर खंदारे यालाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर यांनी केले, तर तपास सहायक पोलीस आयुक्त नीता मिसाळ करत आहेत.

Officials Caught Taking 3 Lakh Bribe for Promoting Education Sevak

महत्वाच्या बातम्या