विशेष प्रतिनिधी
पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर चिमुकली अत्याचार आणि खून खटल्यात आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने ६५ वर्षीय आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवले आहे. न्यायालयात दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला असून, सरकारी वकिलांनी नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली. मात्र, नराधम भीमराव कांबळेला नेमकी कोणती शिक्षा दिली जाणार, याचा अंतिम फैसला आता सोमवार, २९ जून रोजी सुनावला जाणार आहे.Nasrapur minor rape case
न्यायालयाने हा गुन्हा ‘अत्यंत दुर्मिळ आणि अमानवी’ असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे या क्रूरकर्म्याला फाशी मिळणार की जन्मठेप, यासाठी २९ जूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे. नसरापूर चिमुकली अत्याचार आणि खून खटल्यात आरोपीच्या शिक्षेवर कोर्टात अंतिम युक्तिवाद सुरू असताना विशेष न्यायालयाने अत्यंत कडक निरीक्षण नोंदवले आहे. “हा गुन्हा अत्यंत दुर्मिळ, घृणास्पद आणि अमानवी आहे,” अशा शब्दांत न्यायालयाने या कृत्याचा तीव्र निषेध केला. तर दुसरीकडे, सरकारी वकिलांनी नराधम भीमराव कांबळेच्या क्रूरतेचा पाढा वाचत, समाजात असा दाखला बसावा यासाठी त्याला केवळ आणि केवळ ‘मृत्युदंडाची’ (फाशीची) शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि खून खटल्यात आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयात अत्यंत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी ६५ वर्षीय नराधम आरोपी भीमराव प्रभाकर कांबळेला दोषी ठरवले आहे. गुन्हा सिद्ध झाल्यानंतर न्यायाधीशांनी आरोपीला थेट पिंजऱ्यात उभे करून, “तू तो प्रसंग आठव आणि तूच सांग तुला कोणती शिक्षा द्यायला पाहिजे?” असा थेट सवाल केला. त्यावर या निर्लज्ज नराधमाने कोर्टातही स्वतःचा बचाव करत अपघाताचा खोटा बनाव रचण्याचा प्रयत्न केला.
आरोपीला कोणती शिक्षा द्यावी यासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार युक्तिवाद सुरू झाला.
भीमराव कांबळेला स्वतःच्या कृत्याचा कोणताही पश्चाताप नाही, तो दयेच्या अजिबात लायकीचा नाही. ज्या साडेतीन वर्षांच्या मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवला, तिच्यावर त्याने ३९ मिनिटे अतिशय घृणास्पद प्रकार केला. वैद्यकीय तपासणीत समोर आले आहे की, नराधमाने केवळ वासनेपोटी या लहान मुलीवर विविध प्रकारे लैंगिक अत्याचार करताना तिच्या अंगावर तब्बल १८ जखमा केल्या. अशा नराधमाला जर कठोर शिक्षा झाली नाही, तर समाजात भीतीचे वातावरण निर्माण होईल आणि सामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडेल, असा युक्तीवाद सरकारी वकीलांनी केला.
न्यायालयाने स्पष्ट केले की, भीमराव कांबळेवर ज्या ज्या कलमांखाली खटला चालला, ते सर्व गुन्हे सिद्ध झाले आहेत. यातील दोन गुन्ह्यांमध्ये थेट ‘फाशीच्या शिक्षेची’ तरतूद आहे, एका गुन्ह्यात आजन्म जन्मठेप तर एका गुन्ह्यात १४ वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल स्वतः न्यायालयात उपस्थित होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी अवघ्या १५ दिवसांत १२०० पानांचे आरोपपत्र दाखल करून ५५ हून अधिक साक्षीदार तपासले होते. राज्याच्या इतिहासत अवघ्या पावणेदोन महिन्यात निकाल लागणारा हा सर्वात वेगवान खटला ठरला आहे.
Nasrapur minor rape case: Bhimrao Kamble convicted, sentence to be announced on Monday
महत्वाच्या बातम्या