आमचा एकही आमदार काेठेही जाणार नाही, शरद पवार यांचा ठाम विश्वास

विशेष प्रतिनिधी

पुणे : महाविकास आघाडीच्या बैठकीला २३ आमदारांनी दांडी मारल्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटात माेठी फूट पडण्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमचा एकही आमदार काेठेही जाणार नाही असा ठाम विश्वास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. Sharad Pawar

शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी शरद पवार गटाचेही खासदार फुटणार असल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत या सर्व चर्चांवर पहिल्यांदाच अत्यंत स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. “आमचा एकसुद्धा आमदार कुठे जाणार नाही,” असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

शरद पवार हे आज बारामती दौऱ्यावर असून, ते ‘विद्या प्रतिष्ठान’ संकुलात आयोजित एका बैठकीसाठी जात होते. यावेळी त्यांच्या वाहनात त्यांच्यासोबत युगेंद्र पवार हेदेखील उपस्थित होते. विद्या प्रतिष्ठानकडे जात असताना वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधींनी त्यांना गाठले आणि सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर प्रश्न विचारला. “ठाकरे गटाचे ६ खासदार फुटल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षातील आमदार आणि खासदारही फुटणार असल्याची जोरदार चर्चा आहे, यावर तुमचे काय म्हणणे आहे?” असा थेट प्रश्न विचारण्यात आला. यावर क्षणाचाही विलंब न लावता शरद पवारांनी, “आमचा एकसुद्धा आमदार कुठे जाणार नाही,” असे सांगत पक्षातील फुटीच्या चर्चांना पूर्णविराम दिला.



धर्मरावबाबा आत्राम यांनी येत्या 12 डिसेंबरपूर्वी शरद पवार गटाचे 5 खासदार फुटतील आणि ते आमच्याकडे (महायुतीत) येतील,” असा दावा नी केला होता. आत्रामांच्या या दाव्यानंतर आणि ठाकरे गटाच्या खासदारांच्या बंडखोरीनंतर शरद पवार गटही ‘अलर्ट मोड’वर आल्याचे बोलले जात होते. मात्र, पवारांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.

शिवसेना ठाकरे गटात पडलेल्या या मोठ्या फुटीनंतर राज्यातील राजकारणात मोठे भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष सावध झाले असून, ते ‘अलर्ट मोड’वर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेसनेही आपल्या लोकप्रतिनिधींशी संवाद वाढवला असून, आगामी काळात राज्यात आणखी कोणत्या राजकीय घडामोडी घडतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सरकारच्या विरोधात रणनीती आखण्यासाठी महाविकास आघाडीने बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीला तब्बल 23 आमदारांनी पाठ फिरवली हाेती. या अनुपस्थित आमदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचाही समावेश असल्याने महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले आहे.

Sharad Pawar confident no NCP MLA will defect anywhere

महत्वाच्या बातम्या