CM Fadnavis : मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, मंत्र्यांसह अधिकाऱ्यांचे परदेश दौरे रद्द

विशेष प्रतिनिधी

मुंबई : CM Fadnavis पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. 10 मे) सात महत्त्वाच्या घोषणा केल्या आणि देशभरात खळबळ उडाली. ज्यामध्ये प्रामुख्याने पेट्रोल-डिझेलचा मर्यादित वापर, वर्क फ्रॉम होमला प्राधान्य, सोन्याची खरेदी टाळणे आणि स्थानिक उत्पादनांचा (स्वदेशी) वापर वाढवण्यावर भर दिला आहे. तर किमान वर्षभर नागरिकांनी सोने खरेदी करू नये, असे आवाहनही मोदींकडून करण्यात आले आहे. त्याशिवाय, परदेश दौरे करू नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, असेही आवाहन पंतप्रधानांकडून करण्यात आले आहे. त्यामुळे इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दोन उच्चस्तरिय बैठकीत विविध उपाययोजनांचा आढावा घेतला आणि त्यानुसार काही निर्णय जाहीर केले. या बैठकांना मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.CM Fadnavis



पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. परकीय चलन वाचवण्यासाठी आणि प्रशासकीय खर्च कमी करण्यासाठी विविध सरकारी कामांसाठी किंवा अभ्यासासाठी परदेशात जाणाऱ्या मंत्री आणि अधिकाऱ्यांचे दौरे रद्द केले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, यापुढे कोणत्याही तातडीच्या कामाशिवाय परदेश प्रवासाला परवानगी दिली जाणार नाही, असे संकेतही देण्यात आले आहेत. जे दौरे मंजूर झालेले आहेत ते दौरे ही रद्द करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मंगळवारीच विधिमंडळाच्या 12 आमदारांचा जपान दौरा रद्द झाला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता थेट मुख्यमंत्र्यांनीच हे आदेश दिले आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे, या परदेश दौऱ्यांशिवाय आणखी एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मोदींनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहनही केले आहे. त्यामुळे सरकारने राज्यातील मंत्र्यांच्या लवाजम्यावरही आता मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक मंत्र्यांच्या ताफ्यात गाड्यांची मोठी रांग असते, ज्यामुळे इंधनाचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो. ही बाब लक्षात घेऊन सामान्य प्रशासन विभागाने आता मंत्र्यांच्या ताफ्याचा आढावा घेण्याची मोहीम हाती घेतली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तसे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. ज्या मंत्र्यांच्या ताफ्यात गरजेपेक्षा जास्त वाहने आहेत, ती तातडीने कमी केली जाणार आहेत. विशेषतः मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना लागणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा आता कमी दिसणार आहेत.

After PM Modi’s Appeal, CM Fadnavis Cancels Foreign Tours of Ministers and Officials

महत्वाच्या बातम्या