पर्वतीत ७० वर्षीय वृद्धाकडून नातीवर अत्याचाराचा प्रयत्न; संतप्त आईची फाशीची मागणी..

विशेष प्रतिनिधी

पुणे: जिल्ह्यातील नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येची घटना ताजी असतानाच पुणे शहरात आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील पर्वती परिसरात एका ७० वर्षीय वृद्धाने स्वतःच्या नातीवरच अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलीचे आई-वडील रोजंदारीवर कामाला जातात. आई कपड्यांच्या दुकानात काम करते, तर वडील रिक्षा चालक आहेत. बुधवारी रात्री आई कामावरून सुमारे नऊ ते साडेनऊच्या दरम्यान घरी परतली असता, मुलीने घडलेला प्रकार सांगितला. आई घरी पोहोचली तेव्हा मुलीच्या अंगावर कपडे नव्हते आणि शरीरावर नखांचे ओरखडे दिसून आले, अशी माहिती पालकांनी दिली.



या घटनेविषयी बोलताना मुलीच्या आईने तीव्र संताप व्यक्त केला. “माझ्या स्वतःच्या वडिलांनी माझ्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला. अशा माणसाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे,” अशी मागणी तिने केली. या प्रकरणाने केवळ कुटुंबच नव्हे तर संपूर्ण समाज हादरला आहे.

यापूर्वीही घडला होता प्रकार

दरम्यान, मुलीने पालकांना दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीही आजोबांकडून अशाच प्रकारचा प्रयत्न करण्यात आला होता. “तुम्ही कामाला गेल्यावर तात्या मला ओढत होते. तेव्हा मी कसाबसा पळून गेले,” असे मुलीने सांगितल्याचे पालकांनी नमूद केले. मात्र त्या वेळी ही बाब पालकांच्या लक्षात आली नव्हती. दुसऱ्यांदा घडलेल्या या गंभीर प्रकारानंतर संपूर्ण प्रकरण उघड झाले.

या प्रकरणी पोलिसांनी तातडीने दखल घेत तपास सुरू केला आहे. पीडित कुटुंबीयांना पोलिसांकडून सहकार्य मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, “घटनेची जास्त चर्चा करू नका, परिस्थिती चिघळू शकते,” असा सल्ला पोलिसांकडून देण्यात आल्याचे आईने प्रसारमाध्यमांशी बोलताना नमूद केले.

समाजात संताप, कठोर कारवाईची मागणी

अल्पवयीन मुलींवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे समाजात तीव्र चिंता व्यक्त होत आहे. नसरापूर येथील घटनेनंतर लगेचच पुण्यात घडलेला हा प्रकार अधिकच धक्कादायक मानला जात आहे. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करून अशा गुन्ह्यांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

70-year-old man attempts to rape granddaughter in Parvat; Angry mother demands death penalty..

महत्वाच्या बातम्या