हडपसरमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी नराधमाला २० वर्षे सश्रम कारावास

विशेष प्रतिनिधी

पुणे: हडपसर परिसरातील फुरसुंगी येथे सन २०१८ मध्ये एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या पाशवी अत्याचार प्रकरणी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. आरोपी हेमंत कडुबा काथार (वय ४२) याला न्यायालयाने दोषी ठरवून २० वर्षे सश्रम कारावासाची कठोर शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. ६ मे २०२६ रोजी विशेष न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

२०१८ साली हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका चिमुकलीवर हेमंत काथार याने लैंगिक अत्याचार (बलात्कार) केला होता. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण पुणे शहर हादरले होते. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून हडपसर पोलीस ठाण्यात भादंवि ३७६ आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी शिंदे (सध्या नेमणूक: सांगली ग्रामीण) यांनी केला होता. त्यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण रीतीने पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी अभियोक्ता लीना पाठक यांनी सरकार पक्षातर्फे प्रभावी युक्तिवाद केला.

या केसमध्ये ठोस पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची ठरली. हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अंमलदार संभाजी म्हांगरे यांनी भौतिक आणि दस्तऐवजी पुराव्यांची सुयोग्य मांडणी केली. पोलीस अधिकाऱ्यांनी साक्षीदारांना धीर देऊन त्यांची साक्ष प्रभावीपणे नोंदवली, ज्यामुळे नराधमाचा गुन्हा सिद्ध होण्यास मदत झाली.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर, न्यायालयाने आरोपी हेमंत काथार याला २० वर्षे सश्रम कारावास, ५०,००० रुपये (दंड न भरल्यास अतिरिक्त १ वर्ष सश्रम कारावास) अशी शिक्षा सुनावली.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सागर कवडे आणि सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांनी या यशस्वी कामगिरीबद्दल तपास पथकाचे आणि कोर्ट पैरवी अंमलदारांचे कौतुक केले आहे.

Man convicted in Hadapsar minor rape case sentenced to 20 years rigorous imprisonment

महत्वाच्या बातम्या