बाकू दौऱ्यावरून पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात चर्चा; रवी लांडगे म्हणाले ‘हा अभ्यास दौरा’

विशेष प्रतिनिधी

 

पिंपरी-चिंचवड : इंधन दरवाढ, आर्थिक काटकसर आणि पंतप्रधानांच्या परदेश दौरे टाळण्याच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे यांच्या अझरबैजान दौऱ्याची जोरदार चर्चा रंगली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या (UN-Habitat) ‘वर्ल्ड अर्बन फोरम’ परिषदेसाठी महापौरांचा बाकू दौरा निश्चित झाला असून, पंतप्रधानांच्या आवाहनानंतरही ते दौऱ्यावर जाण्यावर ठाम असल्याची माहिती समोर आली आहे.

महापौर रवी लांडगे हे १७ ते २२ मे दरम्यान अझरबैजानची राजधानी बाकू येथे होणाऱ्या जागतिक शहरी मंच परिषदेत सहभागी होणार आहेत. ही परिषद शहरी विकास, स्मार्ट सिटी, पर्यावरणीय नियोजन, नागरी पायाभूत सुविधा आणि शाश्वत शहर व्यवस्थापन या विषयांवर केंद्रित असते. जगभरातील महापौर, नगररचना तज्ज्ञ आणि प्रशासकीय अधिकारी या परिषदेत सहभागी होत असतात.



रवी लांडगे म्हणाले की,’ वर्ल्ड अर्बन फोरम ‘ मध्ये जगातील १९४ देशांचे महापौर एकत्र येतात.शहराच्या विकासाच्या कल्पनांच व्यासपीठ त्याठिकाणी उपलब्ध होत.नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे की, परदेश दौरे टाळा,मात्र मी पर्यटनास जात नसून अभ्यास दौऱ्यासाठी जातोय’ असे महापौर रवी लांडगे यांनी स्पष्ट केले.

पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटी, वाहतूक व्यवस्थापन, कचरा प्रक्रिया, नदी सुधारणा आणि नागरी सुविधा या विषयांमध्ये मोठ्या प्रकल्पांवर काम करत आहे. अशा परिस्थितीत जागतिक शहरी परिषदेत सहभाग शहरासाठी फायदेशीर ठरू शकतो, असेही काही नगरसेवकांचे मत आहे.

Discussion in Pimpri-Chinchwad politics over Baku tour; Ravi Landge said ‘this is a study tour’